फ्रेंडशिप डे (Friendship Day) ...

“Do you have a friendship band for sale?” शी-शू करायची अक्कल आत्ता आत्ता आलेल्या साडेपाच वर्ष्यांच्या  मुलीला मी एका दुकानदारास विचारताना बघितलं  दोन दिवसां पूर्वी.

आमची शाळा आठवली. फ्रेंडशिप म्हणजे काय, ते आम्हाला सातवी-आठवीत (खर बोलायचं तर थोड लवकरच कळायला लागल होत हे सर्व) कळू लागलं. तेदेखील मुला-मुलांच्या फ्रेंडशिपबद्दलच. मुला-मुलींची फ्रेंडशिप वगैरे नाव काढायचीच सोय नव्हती. एक गाल शिक्षकांनी आणि दुसरा घरच्यांनी लाल केला असता, अशी परिस्थिती होती. शाळेत मुला-मुलींच्या गप्पा, मैत्रीवर अघोषित बंदी होती. शाळेनं तशी घातली नव्हती, पण प्रथाही नव्हती. मुला-मुलींना चिडवणं वगैरे चालायचं. एखाद्या मुलीला एखाद्या मुलाच्या नावानं जास्तच चिडवलं जाऊ लागलं, की ती राखीपौर्णिमेला थेट त्याला राखीच बांधायची. मुला-मुलींमध्ये एकच नातं होतं - भावा बहिणींचं! कसं अगदी पवित्र नातं! आम्ही वर्ग डोक्‍यावर घ्यायचो म्हणून सातवीत आम्हाला भयंकर "शिक्षा' झाली होती. मुलींच्या शेजारी एकाच बाकावर बसण्याची! एखाद्या मुलीच्या शेजारी बसण्यासारखा अपमान आणि अवहेलना नव्हती! आम्ही मग बेंचवर "हद्द' आखून घ्यायचो. माझ्या हद्दीत तू फिरकायचं नाही...हात ठेवायचा नाही...पेन इकडे येता कामा नये, एवढ्या पातळीवर ही खुन्नस चालायची. झ्या शेजारी राहणारी मुलगी माझ्या पुढच्याच बाकावर बसायची, पण मी वर्गात तिच्याशी जेमतेम एक-दोनदा बोललो असेन. तेदेखील पेन खाली पडलंय, खोडरबर आहे का वगैरे प्रश्‍नांसाठी. फ्रेंडशिप वगैरे करण्याचं वारं कॉलेजात गेल्यावरच डोक्‍यात शिरलं. स्लॅमबुक देखील वर्षाच्या अखेरीस हाती पडलं.

पण जेव्हा पासून इंटरनेट चा आधार मिळाला, तेव्हा पासून सर्व काही बदलल.  ह्या माध्यमातून अनेक चांगले मित्र मिळाले. कुणी माझ्या गावाचे निघाले, कुणाशी विचार जुळले, कुणाशी भावनिक तारा जमल्या,  अनेकांशी दृढ मैत्री झाली. ती केवळ व्हर्च्युअल न राहता प्रत्यक्षही भेटणं झालं. अहो मला तर माझी बायको हि इथेच भेटली! 

असं असलं, तरी फ्रेंडशिप बॅंड वगैरे मैत्रीच्या देखाव्यात कधी अडकावंसं वाटलं नाही. तशा दिखाऊ मैत्रीपेक्षा खूप घट्ट मैत्री असली, तरी ती जगाला ओरडून सांगावीशी वाटली नाही. कधीकधी स्पष्ट बोलण्यानं, अलिप्त वागण्यानं काही मित्र दुखावले, काही दूर गेले, काहींनी अचानक रामराम ठोकला. पण जे उरले, त्यांच्याशी छान संवाद राहिला. त्यांच्या आयुष्यात वेगवेगळी स्थित्यंतरं आली...दरवेळी मला साथीला जाता आलंच असं नाही, पण त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी, मदतीची भावना कायम राहिली. आजही आहे...जे दूर गेले, त्यांनाही या निमित्तानं परत येण्यासाठी ही हाक आणि जे आहेत, त्यांच्याशी मैत्री अधिक घट्ट व्हावी, ही सदिच्छा!


फ्रेंडशिप बॅंडच्या निमित्तानं बऱ्याच आठवणींवरचा पडदा निघाला. लिहायचं होतं जरा हलकंफुलकं, पण जरा भावनांचे कढ जास्तच झाले.